
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा येथे LPG गॅस टँकर पलटी; चालकाचा मृत्यू, रात्री १० नंतर वाहतूक बंद
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गवरील शाहूवाडी तालुक्यातील आंबा परिसरात एलपीजी गॅस टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टँकर चालक महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर आंबा महामार्ग पोलिस मदत केंद्र तसेच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. टँकरमधील एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया आज रात्री १० नंतर करण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आंबा घाट मार्गे कोकणात जाणारी वाहतूक रात्री १० नंतर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने पर्यायी अणुस्कुरा घाट मार्गे वळवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.



