पुढील दोन दिवस मेघगर्जना; विजांसह पावसाची शक्यता, काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’!


गेल्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, आता पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दोन दिवस पावसाच्या शक्यतेसह ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

यंदा एप्रिल अखेरीस पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास होते. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यात काही प्रमाणात घट होऊन दिलासा मिळाला आहे. रात्री थोडा गारवाही जाणवत आहे. हवामानात झालेल्या बदलांमुळे आता दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ७ आणि ९ मे रोजी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव अशा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, ७ आणि ८ मे रोजी पुण्यासह दक्षिण-मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये (मुंबईसह) उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यातील संवहनामुळे सकाळी उशिरा ते दुपारच्या सुमारास मेघगर्जनेस कारणीभूत ढगांची निर्मिती होऊन दुपार, सायंकाळी पाऊस पडू शकतो. पुण्यातही अंशतः ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, बुधवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान वाशिम येथे ४२.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात ३९.२, अहिल्यानगर येथे ३८.२, जळगाव येथे ४१.२, कोल्हापूर येथे ३७.४, महाबळेश्वर येथे ३२.२, मालेगाव येथे ४०, नाशिक येथे ३७.५, सांगली येथे ३९.३, सातारा येथे ३८.७, सोलापूर येथे ४१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

तसेच कोकणातील अलिबाग येथे ३२.८, रत्नागिरी येथे ३४.६, डहाणू येथे ३४.२, मुंबई येथे ३३.८, मराठवाड्यातील धाराशिव येथे ४०.६, छत्रपती संभाजीनगर येथे ३८.५, परभणी येथे ४१, विदर्भातील अकोला येथे ४२.१, अमरावती येथे ४१.२, बुलढाणा येथे ३८.५, ब्रह्मपुरी येथे ४१.२, चंद्रपूर येथे ४०.४, गोंदिया येथे ३७.९, नागपूर येथे ३९.६, वर्धा येथे ४१.१, तर यवतमाळ येथे ३९.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button