
नीट फेरपरीक्षा २१ जूनला; पेपरफुटीप्रकरणी चूक झाल्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची कबुली!
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-यूजी’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र आता २१ जून रोजी फेरपरीक्षा घेणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी केली. पेपरफुटीप्रकरणी सरकारकडून चूक झाल्याची कबुलीही प्रधान यांनी दिली. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी पुढील वर्षापासून या परीक्षापद्धतीत मोठे बदल केले जाणार असून ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन घेतली जाईल, अशी घोषणाही शिक्षणमंत्र्यांनी केली.
यंदाच्या ‘नीट-यूजी’ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणाने देशभर संतापाची लाट उसळली असून, सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मौन बाळगल्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी पत्रकार परिषदेत ‘नीट’च्या गोंधळावर सविस्तर भूमिका मांडली.
‘राधाकृष्णन समितीच्या शिफारसी लागू करूनही सुरक्षाव्यवस्था कोलमडली आणि ‘कमांड चेन’मध्ये गंभीर बिघाड झाला. ”ही चूक आम्ही मान्य करतो आणि ती दुरुस्त करण्याची पूर्ण जबाबदारी सरकार घेत आहे,” असे प्रधान यांनी सांगितले. या घोटाळ्याचे मूळ कारण ‘ओएमआर’ शीट्स हेच आहे. बहुपर्यायी परीक्षांमध्ये उमेदवारांची उत्तरे नोंदवून घेण्यासाठी ‘ओएमआर’ शीट्स वापरल्या जातात. ही पद्धत बंद करून पुढील वर्षापासून ही परीक्षा ‘संगणक आधारित चाचणी’ (सीबीटी) पद्धतीने घेतली जाईल,’ असे प्रधान म्हणाले.
२१ जून रोजी विनामूल्य फेरपरीक्षा होणार असून ‘एनटीए’ कडून १४ जूनपर्यंत ॲडमिट कार्ड अधिकृत संकेतस्थळावर जारी केले जाईल. हे कार्ड उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थी ॲप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड वापरून ते डाऊनलोड करू शकतील. यासाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिल्लीतील आझादपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘नीट’ परीक्षेची तयारी करणार्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली.
‘एकाही दोषीला सोडणार नाही’
‘एनटीए’मधील एखाद्या व्यक्तीचा या घोटाळ्यामध्ये सहभाग असू शकतो, या शक्यतेवर सर्व अंगाने ‘सीबीआय’ सखोल चौकशी करत आहे. ‘सीबीआय’ ही विश्वासार्ह संस्था आहे. या घोटाळ्यातील सत्य बाहेर येईल, एकाही दोषीला सोडणार नाही, असे प्रधान म्हणाले. दरम्यान, हे प्रकरण उघड झाल्यानंतर मानसिक धक्का बसून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या घटनांबद्दल, ”त्या मुलांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शब्द अपुरे आहेत,” अशा भावना प्रधान त्यांनी व्यक्त केली




