
नवनिर्माण हायमध्ये बालमहोत्सव उत्साहात
रत्नागिरी : विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, नाच, गाणी, मौजमस्ती यासोबतच पालकांनाही कलागुण सादर करण्याची संधी देणारा बालमहोत्सव नुकताच येथील नवनिर्माण हाय येथे साजरा करण्यात आला.
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या या सीबीएसई शाळेत पहिल्यांदाच साजरा झालेल्या बालमहोत्सवाला रत्नागिरीतील सर्व शाळांतील विद्यार्थी आणि पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वप्रथम पालकांना क्रीडो लॅबचा परिचय करून देण्यात आला. हसतखेळत कृतीतून शिक्षण यासाठी ही अभिनव प्रयोगशाळा आहे. यानंतर भेट देणाऱ्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बालरोगतज्ज्ञ डॉ. रोहित पाटील आणि लोकमान्य टिळक हॉस्पिटल यांच्या वैद्यकीय पथकाने ही तपासणी केली.
जादूगार विनयराज यांनी जादूचे प्रयोग सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रांगणाऱ्या व नुकतेच चालू लागलेल्या बालकांसाठी घेण्यात आलेल्या दुडूदुडू धाव स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सहभागी सर्व बालकांना पदके देण्यात आली. किरण बोरसुतकर यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. त्यांनी घेतलेल्या नाचाच्या सत्रात विद्यार्थ्यांनी धमाल आनंद घेतला. कलाशिक्षक निखिल कांबळे यांनी विविध कलाविष्कार सादर केले. सेल्फी कॉर्नर, मुलांना मोफत टॅटू , रंगभरण, भव्य सापशिडी हे उपक्रम होते. नवनिर्माण शाळेच्या विद्यार्थ्यांनीच फनी गेम्स तसेच फूड स्टॉल्स आयोजित करून संभाषण आणि विक्री कौशल्य यांचा अनुभव घेतला.
नवनिर्माण हायच्या पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पाककृती स्पर्धेचे परीक्षण नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे व कलिनरी इन्फ्ल्यूएन्सर झाएबा शोएब यांनी केले. यामध्ये कीर्ति माणगावकर, अलकौसर मोडक आणि सुलताना बाग यांनी पहिले तीन क्रमांक मिळवून आकर्षक बक्षिसे पटकावली. आई आणि मूल या फॅशन शोचे परीक्षण प्रा. निकिता नलावडे आणि सेजल कदम यांनी केले. यामध्ये ऐश्वर्या आणि प्रिया मनोरकर, कुणाल आणि स्वरा कुळ्ये व श्रीशा व अनया शिंदे यांनी पहिले तीन क्रमांक मिळवून आकर्षक बक्षिसे पटकावली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, सर्व संचालक आणि समन्वयिका सीमा हेगशेट्ये यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्याध्यापक उल्हास सप्रे, उपमुख्याध्यापिका प्रज्ञा झारापकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम केले.




