
दापोली तालुक्यातील गव्हे येथील तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू
दापोली तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडी येथील संकेत हरिश्चंद्र पवार (वय ३४) या तरुणाचा मुरुड परिसरात काम करत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेने गव्हे गावावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संकेत पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनीच्या खाजगी ठेकेदाराकडे कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे सहकाऱ्यांसोबत मुरुड परिसरात कामासाठी गेले होते. वीजेच्या पोलवर चढून काम सुरू असताना अचानक त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी उपस्थित सहकाऱ्यांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला. मात्र, संकेत पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाने गव्हे गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.



