
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त येथील जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या सहकार्याने आयोजित केला होता.
कार्यक्रमादरम्यान बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) येथे उपस्थित नागरिकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, कर्करोगासह विविध असंसर्गजन्य आजारांचा वाढता धोका तसेच तंबाखूमुक्त जीवनशैलीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी निरोगी जीवनासाठी तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले.
सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे यांनी जागतिक तंबाखू निषेध दिनाचे महत्त्व स्पष्ट करून तंबाखू व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा रुग्णालयामार्फत उपलब्ध असलेल्या मौखिक कर्करोग तपासणी, निदान व उपचार सुविधांबाबत समुपदेशक प्राची भोसले यांनी माहिती दिली. तंबाखू सेवनामुळे उद्भवणाऱ्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे, त्याचे वेळेवर निदान आणि उपचाराचे महत्त्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जिल्हा रुग्णालयामध्ये तंबाखू व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा, समुपदेशन सुविधा तसेच कर्करोग प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आरएमओ डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. यश प्रसादे, एनसीडी समुपदेशक श्री. रामेश्वर म्हेत्रे तसेच एनपीसीबी समुपदेशक राम चिंचोळे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन तंबाखूचे सेवन टाळावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कामगिरी
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ८७,८६२ नागरिकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आहे. या सेवेमुळे अनेक नागरिकांनी तंबाखूमुक्त जीवनाची सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत २,८४५ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ७१,४२५ नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ओपीडी व आरोग्य शिबिरांमधून १,३५९ व्यक्तींमध्ये मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. यापैकी १४७ कर्करोग रुग्णांचे निदान करण्यात आले असून त्यांना आवश्यक उपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध करणाऱ्या कोटपा (COTPA) कायदा, २००३ अंतर्गत जिल्ह्यात प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी २,५१८ व्यक्तींवर कारवाई करत त्यांच्याकडून २ लाख ८९ हजार २३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या १५४ दुकानांवर कारवाई करत ३० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
या कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असून पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
“जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून स्वतः दूर राहा आणि आपल्या कुटुंबीयांनाही त्यापासून दूर ठेवा. तोंडात जखम, पांढरे डाग, गाठ, जळजळ किंवा इतर कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेत तपासणी करून घ्या. तंबाखूमुक्त जीवन हेच निरोगी जीवन आहे. ३१ मे रोजी आपण सर्वजण तंबाखूमुक्त रत्नागिरी घडविण्याचा संकल्प करूया,” असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
तंबाखू सोडण्यासाठी काही प्रभावी उपाय
✔ तंबाखू सोडण्याचा ठाम निर्णय घ्या.
✔ तंबाखू सेवनास प्रवृत्त करणाऱ्या सवयी व परिस्थिती टाळा.
✔ नियमित व्यायाम, योग व प्राणायामाचा अवलंब करा.
✔ कुटुंबीय व मित्रांचे सहकार्य घ्या.
✔ तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्रांचा लाभ घ्या.
✔ तोंडातील कोणत्याही संशयास्पद लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.




