
कारवांचीवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला मोटारीची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू
रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा रस्ता ओलांडून रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या पादचाऱ्याला मोटारीने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संशयित मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत प्रभाकर मोहिते (रा. एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारवांचीवाडी फाटा रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत प्रभाकर शांताराम साळवी (वय ६६, रा. रॉयल अपार्टमंट, श्रीनगर खेडशी, रत्नागिरी) हे शुक्रवारी सायंकाळी कारवांचीवाडी फाटा येथील रस्ता ओलांडत असताना रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मोटार (क्र. एमएच-०८ बीई ३३७९) वरील संशयित चालक मोहिते यांनी पादचारी प्रभाकर साळवी यांना धडक दिली. या धडकेत साळवी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रूपेश सुधाकर सुर्वे (वय ३५, रा. सुयश कॉम्प्लेक्स मुकादम हॉस्पिटल जवळ, खेडशी रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




