लांजा तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर आयशर टेम्पो -ट्रकचा अपघात; टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू


लांजा तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे आज (१७ एप्रिल) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो आणि समोरून येणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात २६ वर्षीय टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाटुळ-दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे पहाटेच्या सुमारास वेगात येणाऱ्या ट्रक आणि आयशर टेम्पोमध्ये समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की आयशर टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चकाचूर झाला. या भीषण अपघातात चालक मुजाहिद गफूर मुजावर (वय २६, रा. राजापूर, रानतळे आंबेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र, रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने मदतकार्याला उशीर झाला आणि चालकाचा जीव वाचवता आला नाही, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली. या अपघातात टेम्पोमधील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button