
मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडेयांचे निधन
राजापूर येथे जुन्या मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (वय ४२, रा. वरचीपेठ) यांचे शनिवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते.
बुधवारी रात्री आपल्या घरी परतत असताना वरचीपेठ येथील शासकीय विश्रामगृहाखालील वळणावर त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर ते रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले असताना तेथून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने ही बाब एस.टी. डेपो परिसरातील युवकांना कळवली. युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता तांबडे यांच्या अंगावर दुचाकी पडलेली होती. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना प्राथमिक उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती खालावत गेल्याने अखेर सांगली येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अमृत तांबडे हे राजापूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय आणि ओळख निर्माण केलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी राजापूर मतदारसंघातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. सध्या ते ज्योतिष व्यवसायात कार्यरत होते.
त्यांच्या निधनामुळे राजापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे.




