ईटीएस मोजणी मोहिमेत माहिती उघड, रत्नागिरीतील ४७ खाणपट्ट्यांचे ऑडिट होणार


रत्नागिरी जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननात पारदर्शकता आणण्यासाठी आणि अनियमिततेवर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल प्रशासनाने राबविलेल्या ईटीएस मोजणी मोहिमेत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील ४७ गौण खनिज खाणपट्ट्यांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोजणी पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७लाख ६७ हजार ९१५.३५ ब्रास इतके गौण खनिज आढळून आले आहे.
या मोजणीच्या आधारे संबंधित खाणपट्ट्यांवर नियमानुसार ४ कोटी ५९ लाख ३० हजार ९०० रुपयांची भरणायोग्य रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम शासनाच्या महसुलात जमा होणार असून, त्यामुळे सरकारी तिजोरीत मोठी भर पडण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाने आधुनिक ईटीएस तंत्रज्ञानाचा वापर करून खाणपट्ट्यांचे अचूक क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष उत्खननाचे परिमाण निश्चित केले. या प्रक्रियेमुळे उत्खननाची अचूक माहिती उपलब्ध झाली असून, नियमबाह्य उत्खनन किंवा मंजूर पर्यादेपेक्षा अधिक खनिज उपसा झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
प्रशासनाच्या मते, या मोहिमेमुळे गौण खनिज क्षेत्रातील अनियमितता, महसूल बुडविण्याचे प्रकार आणि अवैध उत्खननाला मोठ्याप्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या परवानाधारकांना दंडात्मक कारवाईसह अतिरिक्त भरपाईची रक्कम भरावी लागणार आहे. जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातही ईटीएस मोजणीसह अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाच्यां या उपक्रमामुळे गौण खनिज क्षेत्रात पारदर्शकता वाढण्याबरोबरच शासनाच्या महसुलातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button