खेडच्या विकासाला १५८ कोटींची गती!

सर्वसाधारण सभेत क्रीडा संकुल, व्यापारी संकुल, आरोग्यधामसह ५६ विकास विषयांना मंजुरी;

‘खोकेमुक्त शहर’ संकल्पनेलाही हिरवा कंदील

खेड : खेड शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय खेड नगर परिषदेच्या तिसऱ्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आले. बुधवारी झालेल्या या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित तब्बल ५६ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नियोजनबद्ध शहरी विकासाच्या दृष्टीने अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली. नगरपरिषदेला आतापर्यंत प्राप्त झालेल्या १५८ कोटी रुपयांच्या निधीतून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा माधवी बुटाला, गटनेते निकेतन पाटणे आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. गेल्या आठ महिन्यांत तीन सर्वसाधारण सभा पार पडल्या असून विविध विषय समित्यांच्या बैठका नियमित घेतल्या जात असल्याचे गटनेते निकेतन पाटणे यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्रीडा संकुलासह विविध प्रकल्पांना मंजुरी

शहरातील आरक्षण क्रमांक १४ मधील जागेवर अत्याधुनिक ‘लोकनेते रामदासभाई कदम क्रीडा संकुल’ विकसित करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. या संकुलात जलतरण तलाव, जॉगिंग ट्रॅक, व्यायामशाळा आणि आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील युवकांना आणि खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय खेड-महाड नाका परिसरात व्यापारी संकुल, आधुनिक मटण व मच्छी मार्केट, दवाखाना आणि उद्यान उभारण्याची कामे प्रगतीपथावर असून त्यांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  नामकरणाचे प्रस्ताव मंजूर

सभेत विविध विकास प्रकल्पांना मान्यवरांची नावे देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार क्रीडा संकुलाला लोकनेते रामदासभाई कदम, आरोग्यधामाला हिराचंद परशुराम बुटाला, व्यापारी संकुलाला तु. बा. कदम तसेच मटण मार्केटला हसन (लालुशेठ) मुसा यांचे नाव देण्यात येणार आहे. या नामकरणाला शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंजुरी दिली असून, या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

१५८ कोटींच्या निधीतून मूलभूत सुविधांवर भर

नगरपरिषदेला आतापर्यंत विविध योजनांमधून १५८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील रस्त्यांचे जाळे मजबूत करणे, सांडपाणी व्यवस्थापन, पर्जन्यजल निचरा व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि इतर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शहराचा सर्वांगीण विकास आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कामे केली जात असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

क्रोकोडाईल पार्कचा विषय प्रलंबित; बोटिंग क्लबला पुन्हा चालना

बंदर नाका परिसरातील क्रोकोडाईल पार्क प्रकल्पाचा विषय अद्याप प्रलंबित असला, तरी बोटिंग क्लब आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामांना पुन्हा मंजुरी देण्यात आली आहे. तसेच खांबतळे सरोवर संवर्धन, म्युझिकल फाउंटन आणि तलाव सुशोभीकरण या प्रकल्पांचाही समावेश विकास आराखड्यात करण्यात आला असून, हे प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

‘खोकेमुक्त शहर’ संकल्पनेला गती

शहरातील वाढत्या अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांवर उपाय म्हणून विद्यमान नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीचे दोन भाग करण्यात येणार आहेत. एका भागात आधुनिक व्यापारी संकुल, तर दुसऱ्या भागात नवीन पालिका कार्यालय विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. व्यापारी संकुल उभारल्यानंतर शहरातील अनधिकृत खोके कमी होऊन ‘खोकेमुक्त खेड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा नगरपरिषदेचा मानस असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कर वसुली आणि नागरिकांसाठी दिलासा

सभेत थकित मालमत्ता कर वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घरगुती शौचालय बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा माधवी बुटाला, गटनेते निकेतन पाटणे, संजय मोदी, सुनील दरेकर, रसिका खेडेकर, कुंदन सातपुते आणि प्रेमळ चिखले उपस्थित होते. नगरपरिषदेने घेतलेल्या या निर्णयांमुळे खेड शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून नागरिकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button