धमकी देणार असला तर चर्चा नाही; इराणने शांतता प्रस्ताव नाकारला, जागतिक राजकारणात अभूतपूर्व पेचप्रसंग!

तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या बाजूने पूर्ण तयारी केली होती. त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स आणि जावई जारेड कुशनर यांच्यासह मोठ्या प्रतिनिधीमंडळाचा पाकिस्तान दौरा निश्चित केला होता. इस्लामाबादला छावणीसारखे सज्ज करण्यात आले होते आणि सर्वांना वाटत होते की आता अमेरिका-इराण शांतता करारावर स्वाक्षऱ्या होणारच. मात्र काही तासांतच इराणने स्पष्ट केले की पाकिस्तानमध्ये होणाऱ्या कोणत्याही शांतता चर्चेत ते सहभागी होणार नाहीत.

इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘IRNA’च्या अहवालानुसार अमेरिका-इराण यांच्यातील ही चर्चा पूर्णपणे कोलमडली आहे. वॉशिंग्टनकडून करण्यात येणाऱ्या अवास्तव मागण्या आणि लादल्या जाणाऱ्या अटींमुळे अशा परिस्थितीत कोणतीही चर्चा शक्य नसल्याचे इराणने स्पष्ट केले. तसेच अमेरिका सातत्याने आपली भूमिका बदलत असून त्याच्या विधानांमध्ये विरोधाभास असल्याबद्दलही इराणने नाराजी व्यक्त केली आहे.

एका बाजूला दबाव, दुसऱ्या बाजूला शांततेची भाषा

या तणावाचे केंद्र म्हणजे होर्मूझ सामुद्रधुनी, जिथे सध्या अमेरिका आणि इराणच्या नौदलांमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. इराणने प्रश्न उपस्थित केला आहे की, जर सीजफायरबाबत चर्चा सुरू होती. तर अमेरिकेने अद्याप होर्मूझ आणि इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी का हटवली नाही? इराणच्या मते हे सीजफायरच्या अटींचे उल्लंघन आहे. एका बाजूला आमच्यावर दबाव टाकला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला शांततेसाठी चर्चा करण्याचे आवाहन केले जात आहे, असे इराणचे म्हणणे आहे.

धमक्यांच्या वातावरणात चर्चा अशक्य

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भडक वक्तव्यांनी या तणावात अधिक भर घातली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की धमक्या आणि दबावाच्या वातावरणात कोणतीही अर्थपूर्ण चर्चा होऊ शकत नाही. ‘IRNA’च्या अहवालानुसार सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचणारी चर्चा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

पाकिस्तानचे डॅमेज कंट्रोल

इराणच्या नकारामुळे पाकिस्तानचे प्रयत्न व्यर्थ ठरत असल्याचे दिसताच त्यांनी डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी तत्काळ इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यांनी इराणला संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद करू नयेत, अशी विनंती केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिका-इराण तणावावर सविस्तर चर्चा झाली. पाकिस्तानने मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. इराणच्या ठाम भूमिकेनंतर आता पाकिस्तान हा कूटनीतिक संवाद तुटू नये यासाठी प्रयत्नशील आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button