तुरळमध्ये विहिरीत अडकलेल्या रानगव्याला वनविभागाकडून यशस्वी जीवदान
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावात आज सोमवारी विहिरीत पडलेल्या रानगव्याची वनविभागाने यशस्वी सुटका करून त्याला जीवदान दिले. ही घटना हरेकरवाडी परिसरातील “म्हाताऱ्याचं कोंड” येथे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. विष्णू हरडे यांच्या मालकीच्या विहिरीत अंदाजे दीड वर्षांचा रानगवा पडल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटलांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सदर विहीर सुमारे १५ ते २० फूट खोल असल्यामुळे रानगव्याला बाहेर पडणे अशक्य झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूने रॅम्प तयार केला.
सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास रानगवा सुरक्षितपणे विहिरीबाहेर आला. त्यानंतर तो कोणतीही दुखापत न होता नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने निघून गेला.
या बचाव कार्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनीही मोठे सहकार्य केले.




