
जगबुडी पुलावर एसटी-पिकअपची भीषण धडक; सुदैवाने जीवितहानी टळली
खेड तालुक्यातील खेड-आंबवली मार्गावर कुडोशी येथील जगबुडी पुलावर बुधवारी दुपारच्या सुमारास एसटी बस आणि पिकअप वाहनामध्ये समोरासमोर जोरदार अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, अरुंद पुलावरून एकाच वेळी दोन्ही वाहने समोरासमोर येत असताना चालकांचा अंदाज चुकला आणि जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाली नाही.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही वेळातच खेड पोलीस आणि एसटी प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पुल अरुंद असल्याने अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.




