
गणवेश-साहित्य खरेदीत शाळांची सक्ती बंद,तक्रारी आल्यास संबंधित शाळांवर कारवाई
राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानांतून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यावर शिक्षण विभागाने कडक बंदी घातली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसाबी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत संयुक्त परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजीही प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अशाच सूचना दिल्या होत्या. तसेच दि. ११ जून २००४ च्या शासन निर्णयातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पुन्हा एकदा विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी आणि शिक्षण निरिक्षक यांना या संदर्भात स्पष्ट आदेश दिले आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com




