गुहागरमध्ये धक्कादायक घटना : वडील रागवल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

गुहागर : शाळेत जाण्यावरून वडील रागावले म्हणून वेळणेश्वर येथील विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. बुधवारी दि. 29 रोजी हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर या मुलाचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. गुहागर पोलीस ठाण्यात विकास भाग्या पालशेतकर (वय 48, रा. वेळणेश्वर भाटी) यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांचा मुलगा पारस विकास पालशेतकर (वय 15) हा इयत्ता 9 वी मध्ये शिकत होता. तो शाळेत जाण्यास तयार नव्हता. मी शाळेत जाणार नाही, मला शिकायचे नाही, असे तो वारंवार सांगायचा. मंगळवारी (दि. 28 रोजी) सायंकाळी शाळेत जाण्याच्या मुद्द्यावरून विकास पालशेतकर पारसवर रागावले. त्याचा राग येऊन पारस घराच्या माळ्यावरील एका खोलीत जाऊन बसला. रुसलेला पारस थोड्यावेळाने खाली येईल, असे समजून घराच्यांनी दुर्लक्ष केले. बराच वेळ झाला तरी पारस माळ्यावरुन खाली आला नाही, म्हणून समजूत काढून त्याला घरात बोलवण्यासाठी वडील विकास माळ्यावरील खोलीत गेले. तेथे पारसने खोलीतील लोखंडी अँगलला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. वडिलांनी तातडीने दोरीच्या विळख्यामधून पारसला सोडवले. त्याला उपचाराकरिता हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पारसला मृत असल्याचे घोषित केले.
आत्महत्येची घटना असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राने या घटनेची माहिती गुहागर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी सहकाऱ्यांसह हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून पारसचा मृतदेह पालशेतकर कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button