गणरायांच्या आगमनाने वातावरणात चैतन्य ; ग्रामीण भागात जाखडी नृत्याचे सुरु घुमू लागले

खेड : गेले अनेक दिवस येणार येणार म्हणून भक्तजन ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या देवाधी देव गणरायांच्या आगमनाने वातावरण अतिशय प्रफुल्लित झाले आहे. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाची विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना झाल्यापासून भक्तांमध्ये एक वेगळच चैतन्य पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात तर गणरायाना रिझवण्यासाठी जाखडीचे सूर घुमू लागले असून रात्री उशिरापर्यंत जाखडीचे सुरु ऐकू येत आहेत. हिरवा शालू लपेटून निसर्ग देखील गणरायांच्या स्वागतासाठी उभा राहिला आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेला सण आहे. वर्षाने घरी येणाऱ्या गणरायाची पूजा अर्चा, आणि आरती करण्यामध्ये भक्तांना मिळणार आनंद अवर्णीय असतो. त्यामुळे या सणादरम्यान मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी आपल्या मूळ गावी येत असतात. त्यामुळे या उत्सवांदरम्यान एरवी शांत असलेला ग्रामीण भाग चाकरमान्यांच्या गजबजाटाने गजबजून जातो. गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी रात्रंदिवस गणपती बापाचे भजन, कीर्तन आणि जाखडी नृत्यात रममाण झालेले असतात. काही जणांच्या घरी दीड दिवस तर काहीजणांच्या घरी पाच दिवस बाप्पांचे वास्तव्य असते.
गेली दोन वर्ष राज्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट असल्याने गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले होते. तयामुळे लाडक्या बाप्पाचा उत्सव मनाजोगा साजरा करण्यात आला नव्हता. इच्छा असूनही चाकरमान्यांना गावाला येता आले नव्हते. सार्वजनिक गणेशोत्सवावर तर जवळजवळ बंदीच घातली गेली होती. त्यामुळे गणेशोत्सव कधी आला आणि गेला हे कळलेच नव्हते मात्र यावर्षी गणरायांच्या कृपेने कोरोनाचे संकट सरले असल्याने यावर्षी गणेशोत्सव निर्बंध मुक्त झाला आहे. त्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. दोन वर्षे येऊ न शकलेले चाकरमानी या वर्षी मोठ्या संख्येने आपापल्या गावी आले आहेत. साहजिकच गावागावात गणेशोत्सवाचा आनंद पहावयास मिळत आहे. यावर्षी खेड तालुक्यात १३ हजार २४ घरगुती तर १७ सर्वजणी गणरायणाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
गणरायांच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे निसर्ग देखील सज्ज आहे. हिरवाईचा शालू लपेटून निसर्ग जणू गणरायांच्या स्वागतासाठी उभा आहे. पहाटेच्या वेळेत गार्ड झाडीतून कोकिळेचे मंजुळ स्वर ऐकू येत आहेत. एका बाजूला गणरायाचा महिमा वर्णात करणाऱ्या ध्वनिफिती आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी झाडावर बसून कुहू कुहू गाणाऱ्या कोकिळेचा मंजुळ स्वर मनाला अतीव समाधान देत आहेत.
गणरायांच्या आगमनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले असतानाच शनिवारी गौराई मातेचे आगामी होत आहे. सोन्याच्या पावलांनी घरी येणाऱ्या गौराईच्या स्वागतासाठी महिला सज्ज झाल्या आहेत. या वर्षी गौराईंचे आगमन पूर्वा नक्षत्रात होत असल्याने यावर्षी नवे ओवसे होणार असल्याने सुहासिनींनीच्या आनंदात भर पडली आहे.रविवारी गौरी पूजन झाल्यावर सोमवार पाच दिवसांचे गणपती आणि गौराईचे विसर्जन केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button