
गोकुळच्या सत्तासंघर्षात राज ठाकरे सतेज पाटील यांच्या समर्थनार्थ; भाजपवर जोरदार टीका
शासननियुक्त पाच संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यावरून सवाल; ‘भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे’ राज ठाकरे यांची टीका
मुंबई : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. शासननियुक्त पाच संचालकांपैकी चौघांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावर त्यांनी भाजपवर टीका करत सतेज पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.
गोकुळच्या निवडणुकीत भाजप पॅनेलचे १२, तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे १३ संचालक निवडून आले. मात्र, त्यानंतर शासनाकडून पाच संचालकांची नियुक्ती करून त्यापैकी चौघांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून भाजपला लक्ष्य केले. निवडणुकीत बहुमत मिळवता आले नाही म्हणून शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकशाहीची काळजी असल्यास निवडून आलेल्या संचालकांच्या बहुमताचा आदर करायला हवा, असेही त्यांनी म्हटले.
सत्तेत असतानाही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढणारा भाजप स्वतःच लोकशाहीचा गळा आवळत असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ असताना भाजपमध्ये समजूतदारपणाचा दुष्काळ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करून विरोधकांचे बहुमत स्वीकारण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
दरम्यान, या शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात काँग्रेसने न्यायालयात जाण्याची तयारी केली असून, गोकुळचा सत्तासंघर्ष आता न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.




