नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकमतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी


*रत्नागिरी, दि. 01 :- नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक राज्यात जाहीर झाल्या आहेत. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीच्या आदेशानुसार मतदानाच्या दिवशी 2 डिसेंबर 2025 रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीचा हक्क बजावण्यासाठी सदर सुट्टी देण्यात येत आहे.
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदारास मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, सदर नियोक्त्याविरुध्द नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button