भारतीय सैन्याला माझ्या सर्व सामन्यांची फी…’, सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला हरवल्यानंतर मोठी घोषणा


आशिया कप २०२५ स्पर्धा भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकली. या संपूर्ण स्पर्धेत भारताने ७ सामने खेळले. या सातही सामन्यात भारताने विजय मिळवत आशिया कप ट्रॉफी नवव्यांदा पटकावली.

भारताने रविवारी (२८ सप्टेंबर) दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करत ही ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतीय सैन्याप्रती आदर दाखवताना मोठी घोषणा केली आहे.

एप्रिलमध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात २६ नागरिकांनी प्राण गमावले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला.

यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजनक परिस्थिती होती. भारतीय सैन्याने यावेळी अतुलनीय शौर्य दाखवले होते. पण या घटनांना ही दिवसच उलटले असताना आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत – पाकिस्तान सामने झाले, त्यामुळे या सामन्यांना वादाची आणि भावनिक किनारही लाभली.

या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तान संघाशी हस्तांदोलनही टाळले होते. तसेच साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतीय सैन्याला आणि पहलगाममधील पीडितांच्या कुटुंबियांना समर्पित केला होता. मात्र यामुळे आयसीसीने राजकीय संदर्भ असल्याने सूर्यकुमारवर ३० टक्के दंडाची कारवाई केली होती.

मात्र असं असलं तरी आता सूर्यकुमारने अंतिम सामन्यानंतर मोठी घोषणा करत सांगितले की आशिया कपमधील सर्व ७ सामन्यात त्याला मिळालेली मॅच फी तो वैयक्तिकरित्या भारतीय सैन्याला देणार आहे. पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत आशिया कप जिंकल्यानंतर सूर्यकुमारन पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

त्याने सांगितेले की ‘हे माझ्याकडून आहे, कदाचित यामुळे वाद होऊ शकतो, पण खरंतर ते वादग्रस्त नाही. मी वैयक्तिकरित्या या संपूर्ण स्पर्धेत मी खेळलेल्या सामन्यांची मॅच फी मी भारतीय सैन्यदलाला देतोय.’ सूर्यकुमार यादवच्या या कृतीचे सध्या सर्वांकडून कौतुक होत आहे. सूर्यकुमारने या स्पर्धेतील सर्व ७ सामने खेळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button