
साडवलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुखरूप सुटका
संगमेश्वर : तालुक्यातील मौजे साडवली (नैदरवाडी) येथे एका खाजगी विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने तत्परतेने आणि कौशल्याने सुटका करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

साडवली येथील राजेश परशराम चव्हाण यांच्या खाजगी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजता वन विभागाला मिळाली. त्यानंतर परिमंडळ वन अधिकारी, संगमेश्वर-देवरुख यांचे पथक आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत संबंधित विहीर सुमारे ५ बाय १२ फूट आकाराची व २० फूट खोल असल्याचे आढळले. बिबट्या विहिरीतील एका आधारावर उभा राहत पाण्यात पोहत असल्याचे दिसून आले.
परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वन विभागाने लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून तो विहिरीत उतरवला. काही क्षणांतच बिबट्या स्वतःहून पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
यानंतर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय, देवरुख यांच्या मार्फत बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला वन विभागाने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी श्री विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. वनपाल श्री सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सुरज तेली, सुप्रिया काळे तसेच प्राणीमित्र अनुराग आखाडे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी साडवलीचे पोलीस पाटील व मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनीही बचावकार्यात मोलाचे सहकार्य केले.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा कोणताही वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ वन अधिकारी, संगमेश्वर-देवरुख यांनी केले आहे.



