
आयात शुल्क मुक्त पहिला स्कॉटिश मासा भारतात, स्थानिक मच्छीमार व मत्स्य उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण
भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या महत्वाच्या व्यापार करारानंतर स्कॉटलँडमधील सल्मोन माशाची पहिली आयात शुल्कमुक्त खेप भारतात अधिकृतपणे बंगळुरूमध्ये दाखल झाली. १५ जुलैपासून लागू आलेल्या या करारामुळे ब्रिटनची बाजारपेठ भारताच्या निर्यातीसाठी खुली झाली असली तरी या स्वस्त आणि प्रीमियम परदेशी माशांच्या आगमनामुळे कोकण किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमार व मत्स्य उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सशिमी फूड्स या कंपनीने बँकाफ्रॉस्ट स्कॉटलंडकडून ही आयात केली असून यावरील ३३ टक्के आयात कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, व्यापार कराराच्या दुसर्या बाजूने विचार केल्यास, भारताच्या सागरी उत्पादनांना ब्रिटनमध्ये ९९ टक्के ड्युटी-फ्री प्रवेश मिळाला असून कोळवी, ट्यूना यासारख्या उत्पादनांना मोठी जागतिक संधी मिळाली आहे. मात्र, याचा थेट आणि तत्काळ फटका देशांतर्गत बाजारपेठेतील स्थानिक मत्स्य व्यवसायाला बसण्याची दाट भीती व्यक्त होत आहे.




