
नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील गुन्हे मागे घ्या
राजापूर शिवसेना (उबाठा) आक्रमक; तहसील व पोलीस प्रशासनामार्फत केंद्र-राज्य सरकारला निवेदन
राजापूर : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राजापूर तालुका शाखेने केली आहे. याबाबत राजापूर तहसील कार्यालय तसेच राजापूर पोलीस ठाण्यात केंद्र व राज्य सरकारला उद्देशून निवेदन सादर करण्यात आले.
दिल्लीतील जंतर-मंतर तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर अनेक विद्यार्थी व युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर राजापूर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देत आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठविणाऱ्या विद्यार्थी व युवकांवर गुन्हे दाखल करणे योग्य नसल्याची भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.
पेपरफुटी प्रकरणातील संबंधित रॅकेटवर कठोर कारवाई करावी आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थी व युवकांवरील सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, विधानसभा संघटक रामचंद्र सरवणकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख अनाजी गोटम, अभिजित तेली, उपनगराध्यक्ष विनय गुरव, माजी शहरप्रमुख अनिल कुडाळी, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष हातणकर, तालुका अधिकारी सुभाष नवाळे, शहर युवतीप्रमुख प्रतीक्षा मांजरेकर, विभागप्रमुख रुपेश नारकर, विलास नारकर, नरेश शेलार, उपविभागप्रमुख नामदेव नागरेकर, रवी पैकडे, गणेश गिरकर, विठोबा हरयाण, प्रकाश डूकळे, अनंत कोलते, उपविभाग संपर्कप्रमुख विद्याधर पेडणेकर, दिवाकर मयेकर, मल्लू कोल्हे, विभाग संघटक मंदा शिवलकर, स्नेहा उगले, मिनाक्षी गुरव, उपशहर युवासेना पदाधिकारी गार्गी चिपटे, मनीषा वडके, गणपत मोंडे, शाखाप्रमुख संजय पेडणेकर, चंद्रकांत झापणेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.




