
जनसमर्थ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड/पीक कर्ज उपलब्ध
रत्नागिरी, दि. 21 :- जनसमर्थ केसीसी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता नवीन पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलमध्ये अॕग्रीस्टॅक डेटा प्रणालीच्या पोर्टलचे एकात्मिकरण केले असून पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक, सुलभ व कागद विरहित पद्धतीने पीक कर्ज मंजुरी करता येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
या पोर्टलद्वारे जिल्ह्यातील अकरा बँकांद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँका जनसमर्थ पोर्टलवर यशस्वीपणे ऑन बोर्ड केले आहेत. शेतकऱ्याचे या बँकांपैकी कोणत्याही बँकेत खाते असावे. पीक कर्ज मंजूरीची प्रणाली कार्यान्वित केली असून शेतकऱ्यांना कोणत्या भौतिक कागदपत्रांशिवाय ऑनलाइन प्रणाली द्वारे तातडीने कर्ज मंजुरी होणे शक्य आहे.
या प्रणालीद्वारे पीक कर्ज मंजुरीसाठी आधार क्रमांक सक्रिय मोबाईल नंबरशी संलग्न असावा. शेतकरी अॅग्रीस्टॅक रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत असावा व त्यास मंजुरी प्राप्त झालेली असावी. सद्यस्थितीत जमिनीची वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही सुविधा कार्यान्वित केलेली आहे. त्याशिवाय पीक कर्ज मंजूरीसाठी प्रत्येक बँकेचे इतर स्वतंत्र पात्रता निकष असू शकतात. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागास संपर्क साधावा. महा ई सेवाकेंद्रातून अर्ज करावा किंवा निवडलेल्या बँकेस संपर्क साधावा.



