
️दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार!
Milk Rate Increase : डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असून हे नवे दर मंगळवार (ता. ११) पासून लागू होणार आहेत.
दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक शुक्रवारी (ता. ७) पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत वाढत्या उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
मागील काही काळात डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची वाढ, साखरेच्या दरात १२ रुपये प्रतिकिलो वाढ, पॅकिंग खर्चात ३० टक्क्यांहून अधिक वाढ तसेच दूध खरेदी दरातही वाढ झाल्याने दूध व्यवसायावरील आर्थिक ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा आणि वाढत्या उत्पादन, पॅकिंग, वाहतूक व इतर खर्चाचा समतोल साधता यावा, यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांचा दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ॲनालॉग पनीरवरील बंदीच्या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य करणारे आमदार विक्रम पाचपुते यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.




