संस्थापक कै. बाबुराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त कीर्तनातून जीवनकार्याला उजाळा


रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कैलासवासी बाबुराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे गुरुवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी तसेच संस्थेच्या संस्थापिका कै. मालतीबाई जोशी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संस्थापक बाबुराव जोशी यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रशालेचे प्रयोगशाळा सहाय्यक सचिन साठे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून कैलासवासी बाबुराव जोशी यांचा जीवनपट तसेच त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य अत्यंत प्रभावीपणे उलगडून सांगितले. रत्नागिरीसारख्या त्या काळच्या मागास भागात मुलींच्या शिक्षणाची गरज ओळखून कै. बाबुराव जोशी यांनी १ जानेवारी १९२५ रोजी मुलींसाठी शाळेची स्थापना करून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या शैक्षणिक कार्याचा आज मोठा विस्तार झाला आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विभागाच्या चार शाखा, प्राथमिक विभागाच्या तीन शाखा, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय तसेच विविध वसतिगृहे अशा अनेक शैक्षणिक संस्थांचा विस्तार होऊन संस्थेचा भव्य शैक्षणिक वटवृक्ष उभा राहिला आहे. या विविध शाखांमधून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थापकांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
कैलासवासी बाबुराव जोशी यांचा जीवनप्रवासही संघर्षमय आणि प्रेरणादायी होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण देवरुख जिल्हा रत्नागिरी lयेथे झाले. त्यानंतर वकिलीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुणे येथे घेतले. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांचा महर्षी धोंडो केशव कर्वे तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी संपर्क आला. या विचारवंतांच्या कार्याचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला आणि ते समाजसेवेच्या कार्याशी जोडले गेले. शिक्षण, समाजसेवा आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
सचिन साठे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कीर्तनाच्या माध्यमातून बाबुराव जोशी यांच्या जीवनातील विविध पैलू प्रभावीपणे मांडले. त्यांच्या कीर्तनाला हार्मोनियमची साथ रुद्रांश लोवलेकर तर तबला साथ श्रीनिवास नाटेकर यांनी दिली. या तिघांच्या सुरेल आणि प्रभावी मैफिलीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजना तारी यांनी कीर्तनकार सचिन साठे यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या प्रभावी सादरीकरणाचे कौतुक केले. तसेच हार्मोनियम वादक रुद्रांश लोवलेकर आणि तबला वादक श्रीनिवास नाटेकर यांचा श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख दिव्यता नागवेकर यांनी मानले.
कै. बाबुराव जोशी यांनी शंभर वर्षांपूर्वी लावलेले मुलींच्या शिक्षणाचे रोपटे आज ज्ञानदानाच्या विशाल वटवृक्षात बहरले असून, त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कीर्तनातून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button