
इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये रत्नागिरीचा झेंडा उंचावला; अविराज गावडेचा अष्टपैलू जलवा, सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले!
इंग्लंडमधील प्रतिष्ठित काऊंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने पुन्हा एकदा आपल्या अष्टपैलू खेळाची छाप पाडत क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अविराजने दमदार फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामनावीर पुरस्कार पटकावत आपल्या संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
अलेक्झांडर पार्क क्रिकेट क्लबविरुद्ध झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात अविराजने प्रथम फलंदाजीत चमक दाखवत नाबाद ६० धावांची खेळी साकारली. त्याच्या संयमी आणि जबाबदार खेळीमुळे संघाला भक्कम धावसंख्या उभारता आली.
यानंतर गोलंदाजीतही त्याने आपली जादू दाखवली. आपल्या गुगलीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना सतत अडचणीत टाकत अविराजने २.६१ च्या प्रभावी इकॉनॉमीने ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. क्षेत्ररक्षणातही दोन झेल टिपत त्याने प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. परिणामी अलेक्झांडर पार्क क्रिकेट क्लबचा डाव अवघ्या १५५ धावांत संपुष्टात आला.
अविराजच्या सर्वांगीण कामगिरीच्या बळावर पेशवा क्रिकेट क्लबने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. त्याच्या शानदार योगदानाची दखल घेत त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, यापूर्वीही ‘लंडन टायगर्स’ संघाविरुद्ध अविराजने अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवले होते. आता सलग दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत त्याने इंग्लंडच्या क्रिकेट वर्तुळात रत्नागिरीसह भारताचे नाव अभिमानाने उजळवले आहे.
अविराजच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे




