आश्वासनानंतरही पुरी तळण्याचा कारखाना सुरूच; २ ऑक्टोबरला आमरण उपोषणाचा इशारा

दत्तात्रय मोरे यांचा आरोप; प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी

खेड : भरणे ग्रामपंचायत हद्दीतील पुरी तळण्याचा कारखाना बंद करण्याबाबत प्रशासनाकडून आश्वासन मिळूनही संबंधित व्यवसाय सुरूच असल्याचा आरोप करत ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय सखाराम मोरे यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. येत्या २ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी पंचायत समिती, खेड कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
न्यू श्रीराम समर्थ सोसायटी, भरणे येथे राहणारे दत्तात्रय मोरे यांनी संबंधित पुरी तळण्याच्या कारखान्यामुळे धूर, उग्र वास, उष्णता तसेच अन्य त्रास होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणी भरणे ग्रामपंचायतीपासून तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारंवार पत्रव्यवहार केल्याचे मोरे यांनी सांगितले.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या ग्रामपंचायतीच्या लेखी उत्तरात संबंधित कारखान्यास ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे नमूद असल्याचा दावा मोरे यांनी केला आहे.
यापूर्वी प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित कारखाना सुरूच असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी उपोषणाचा इशारा दिला असून, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दत्तात्रय मोरे यांचे वय ७६ वर्षे असून, स्वतःवर हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या पत्नीचेही वय ७० वर्षे आहे. त्यामुळे आपल्या वयाचा आणि आरोग्याचा विचार करून प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
“आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी. संबंधित कारखान्याबाबत प्रशासनाने निर्णय घेऊन तो अमलात आणावा,” अशी भूमिका मोरे यांनी मांडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button