
राजापूर ग्रामीण रुग्णालयात ‘आयुर्वेद दिवस’ उत्साहात‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ संकल्पनेवर विविध उपक्रम; औषधी वनस्पती, रानभाज्या व पोषण आहाराचे प्रदर्शन
राजापूर, प्रतिनिधी : ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे बुधवार (२३ सप्टेंबर) ‘आयुर्वेद दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या आयुर्वेद दिनाची मध्यवर्ती संकल्पना ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ ही होती. या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. जी. मेस्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेद, योग आणि सकस आहार यांची सांगड घालण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षणी यांनी दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचे महत्त्व, विविध आयुर्वेदिक उपचारपद्धती आणि आरोग्य संवर्धनासाठी आयुर्वेदाचा उपयोग याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानिमित्त रुग्णालय परिसरात विविध औषधी व बहुगुणी वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वनस्पतींचे औषधी गुणधर्म आणि दैनंदिन जीवनातील उपयोग याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून स्थानिक भागात आढळणाऱ्या पौष्टिक व आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विविध पौष्टिक अन्नपदार्थांचेही प्रदर्शन मांडण्यात आले. संतुलित व सकस आहाराचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘आयुर्वेद व सेवा संकल्प तसेच अवयवदान’ याबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘आयुर्वेद दिवस’ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.




