जनतेच्या दारी गृहराज्यमंत्री; २४ तास गावात मुक्काम करून जाणून घेणार समस्या

नवरात्रीपासून अभिनव उपक्रमाला सुरुवात; अधिकाऱ्यांसह गावातच प्रश्नांवर चर्चा

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे. नवरात्रीपासून या उपक्रमाची सुरुवात होणार असून, महिन्यातून एक दिवस ते मतदारसंघातील एका गावात संपूर्ण २४ तास मुक्काम करणार आहेत.
या उपक्रमांतर्गत योगेशदादा कदम गावातच मुक्काम करून ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत. गावातील पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न आणि अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनाही गावात बोलावून नागरिकांच्या समस्यांवर जागेवरच चर्चा करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यातील दरी कमी व्हावी तसेच प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाला गती देतानाच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळावा, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
महिन्यातून एक दिवस गावातच मुक्काम करून ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासोबत त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याचा योगेशदादा कदम यांचा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्रशासनाच्या पातळीवर तातडीने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button