
विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश खेळनिहाय कौशल्य चाचणी आयोजन.
रत्नागिरी, दि. 17 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सदर ९ क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (५० टक्के) व कौशल्य चाचणी (५० टक्के) प्रक्रिये अंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन २५ ते २६ जून २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहेत. विभागस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंची राज्यस्तर चाचणी ५ जुलै ते ८ जुलै २०२५ या कालावधीत खेळनिहाय राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.
विभागस्तर चाचणी करिता पात्र खेळाडूंनी आपले अर्ज (खेळाडूचे नाव, जिल्हा, खेळप्रकार, जन्मदिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, प्लॉट नं. ओएस-१५, मिरजोळे एम. आय. डी. सी. रत्नागिरी येथे २३ जून २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत. अर्जासोबत जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, जन्मप्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्रे ) सत्यप्रती जोडाव्यात. अधिक माहितीकरिता संपर्क. गणेश खैरमोडे, क्रीडा मार्गदर्शक (९२८४३४२२१०) यांना संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेलानिहाय कौशल्य चाचणीसाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा नऊ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग अशा १७ क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. क्रीडा प्रबोधिनीतील खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो. चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेवून शारीरिकदृष्ट्या सुद्रृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते.
याकरीता वयोमर्यादा ०७ जुलै २००६ नंतर जन्मलेले व ०८ जुलै २०२५ रोजी पर्यन्त १९ वर्ष पूर्ण आहे. विभाग व राज्यस्तर चाचणी करिता येणा-या खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे. खेळाडूंनी संबंधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इत्यादी माहिती चाचणीस्थळी आणणे बंधनकारक आहे. मान्यतेत निवड प्रक्रिया राबविताना सरळ प्रवेश प्रक्रियेन्वये जर इच्छुकांची संख्या ५० टक्के पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणी प्रथम त्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा व उर्वरित जागेंवर कौशल्य चाचणीव्दारे प्रवेश देण्यात येईल. मैदानी / सायकलिंग / शुटींग या खेळकरिता राज्य निपुणता केंद्र २० वर्ष वयोगट अंतर्गत चाचणी आयोजित करण्यात येणार आहेत व उर्वरित खेळाकरिता १९ वर्षाआतील मर्यादा असेल.
मिशन लक्षवेध अंतर्गत असलेल्या खेळाकरिता मैदानी / आर्चरी / बॉक्सिंग / वेटलिफ्टिंग / हॉकी/ कुस्ती / शुटींग / टेबल टेनिस / बेडमिंटन या खेळकरिता सरळ प्रवेश (राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय सहभाग) असलेल्या खेळाडूंची चाचणी आयोजित होतील. हॅडबॉल/ जलतरण/सायकलिंग/फुटबॉल/जुदो/जिम्नॅस्टिक्स या खेळांकरिता सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी (राज्यस्तर सहभाग असलेले खेळाडू) अश्या दोन्ही प्रक्रियेद्वारे चाचण्या आयोजित करण्यात येईल. मैदानी / सायकलिंग / शुटींग या खेलाकरिता राज्य निपुणता केंद्र २० वर्ष वयोगट अंतर्गत चाचणी आयोजित करण्यात येईल, उरलेल्या खेळकरिता १९ वर्षाआतील मर्यादा असेल. एखाद्या खेळात राज्यभरात विभागनिहाय चाचणी करिता खेळाडूंची संख्या कमी आल्यास सदर खेळाची चाचणी विभागस्तरावर आयोजित न करता सरळ राज्यस्तरावर होईल.