
आम आदमी पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिपदासाठी अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
देशाची राजधानी दिल्लीची पुन्हा एकदा कमान महिलेच्या हाती गेली आहे. आम आदमी पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिपदासाठी अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.आज आपच्या आमदारांची बैठक पार पडली त्यात अतिशी मार्लेना यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सोडल्यानंतर दिल्लीत नवीन मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू होती. त्यात अतिशी यांचं नाव पुढे आले आहे.नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या घरी सर्व आमदारांची बैठक झाली. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजीनामा देतील त्यानंतर अतिशी या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कार्यभार सांभाळतील. संध्याकाळी ४.३० वाजता केजरीवाल उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्रिपदासह इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल. आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला त्यावर सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.