
लांजा येथील मिथिलेश देसाई यांच्या फणस शेतीतील नव्या प्रयोगांना केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांची सकारात्मक दाद
आंध्रप्रदेशात Blockchain व Traceability पायलट प्रकल्प सुरू करण्याची तयारी
नवी दिल्ली : वैयक्तिक कामानिमित्त दिल्ली येथे गेलेल्या कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील तरुण उद्योजक मिथिलेश देसाई यांनी भारताचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री तथा देशातील आजवरचे सर्वात तरुण केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री श्री. राम मोहन नायडू यांची भेट घेतली. या भेटीत वैयक्तिक विषयासोबतच फणस शेती, कृषी-तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी नव्या व्यावसायिक संधी निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
फणस शेतीमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेताना मंत्री नायडू यांनी या कामाबद्दल विशेष उत्सुकता व्यक्त केली. फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असतानाही त्यातील काही भाग योग्य प्रक्रिया, साठवणूक आणि बाजारपेठेअभावी वाया जातो. हा Wastage कमी करून फणस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धन आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, आंध्रप्रदेशातील त्यांच्या मतदारसंघातही फणस हे प्रमुख पीक असल्याने या क्षेत्रातील प्रयोग प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशात येण्याचे निमंत्रण देसाई यांना दिले. फणस उत्पादनाशी संबंधित शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबतही यावेळी चर्चा झाली.
यावेळी जिवलग मित्र गौरव यांनी कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामाची माहितीही केंद्रीय मंत्री नायडू यांनी जाणून घेतली. Agri Tech, Blockchain आणि Traceability यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात केल्यास शेतमालाची पारदर्शकता, गुणवत्ता, बाजारपेठ आणि शेतकऱ्यांना मिळणारे मूल्य यामध्ये मोठी सुधारणा होऊ शकते, यावरही चर्चा झाली.
या चर्चेच्या पुढील टप्प्यात आंध्रप्रदेशमध्ये Blockchain आणि Traceability आधारित पायलट प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फणस शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांसाठी अधिक सक्षम आणि शाश्वत मूल्यसाखळी उभारण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी फणस शेतीतील या उपक्रमाबद्दल दाखविलेली उत्सुकता आणि आंध्रप्रदेशात प्रत्यक्ष काम करण्यासाठी दिलेले निमंत्रण हे कृषी-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उत्साहवर्धक ठरले आहे.




