
विभागीय सायकलिंग स्पर्धेत आरसीसीच्या रुद्र जाधवचे यश

रत्नागिरी : कोल्हापूर विभागस्तर सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या (आरसीसी) रुद्र दर्शन जाधव याने १४ वर्षांखालील गटात घवघवीत यश प्राप्त केले असून आता त्याची निवड अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी झाली आहे. श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (जीजीपीएस) इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रुद्रने सायकलिंग इव्हेंट- मास स्टार्ट या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
रुद्र जाधव याने गतवर्षीही विभागीय स्तरावर मजल मारली होती. मात्र या वर्षी त्याने स्पर्धेसाठी कसून व नियमित सराव करत त्याने हे यश मिळवले आहे. याकरिता अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक अभिनंदन भोसले (स्मायली सायकलिंग अकॅडमी) यांचे कडे रुद्र मागचे ७-८ महिने ट्रेनिंग घेत आहे. विनायक पावसकर, डॉ. नितीन सनगर, यांचे सहकार्य लाभले, वडील दर्शन आणि सौ. निशा यांचे प्रोत्साहन लाभले आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत आणि क्लबमधील सर्व सदस्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अहिल्यानगर येथे होणार आहे.
सायकल स्पर्धा व जिल्ह्याबाहेरील इव्हेंटमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर मेहनतीसह सायकलही तितकीच दर्जेदार असणे आवश्यक असते. ही गरज ओळखून राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबसाठी सायकल उपलब्ध झाली. नवनवीन सायकलपट्टू घडवण्यासाठी या सायकलचा उपयोग होत असून यापूर्वी सौरभ रावणंग यानेही या सायकलचा उपयोग करून यश मिळवले. विभागीय स्पर्धेसाठी ही सायकल रुद्र वापरत असून त्याने सुयश मिळवून या सायकलचा योग्य उपयोग होत असल्याचे दाखवून दिले आहे. या सायकलचा उपयोग मला स्पर्धेसाठी झाला आहे, असेही रुद्रने सांगितले. याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनेही पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.




