
भोस्ते घाटात कंटेनरची कारला पाठीमागून जोरदार धडक; कार महामार्गावरून खाली
सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत नाही; कारचे मोठे नुकसान

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला भरधाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार महामार्गावरून खाली गेली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दोन्ही वाहने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना कार (क्र. UP 14 ER 3729) भोस्ते घाटातील ब्लाइंड स्पॉट परिसरातून पुढे जात होती. याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर (क्र. HR 55 AF 1736) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार महामार्गावरून खाली फेकली गेली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक कार्यवाही केली.
भोस्ते घाटातील ब्लाइंड स्पॉट आणि वाहनांचा भरधाव वेग यामुळे अपघाताचा धोका कायम असून, या परिसरातून प्रवास करताना वाहनचालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळल्याने मोठा अनर्थ टळला.




