
यूपीच्या निवडणुकीत कॉक्रोच जनता पार्टीचा पाठिंबा कोणाला? अभिजीत दिपकेंनी सांगितली पुढील योजना; “सीजेपी स्वतः.”
नीट पेपरफुटी प्रकरण असेल किंवा एसआयआरचा मुद्दा असेल किंवा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा असेल अशा वेगवेगळ्या विषयांवर कॉक्रोच जनता पार्टीने देशभरात आंदोलने केले आहेत. तसेच कॉक्रोच जनता पार्टी सक्रिय राजकारणात येणार नसल्याचंही आणि निवडणुका लढवणार नसल्याचंही संस्थापक अभिजीत दिपके यांनी जाहीर केलेलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक कॉक्रोच जनता पार्टी लढवणार का? किंवा कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणार का? यावर अभिजीत दिपकेंनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
अभिजीत दिपकेंनी काय म्हटलं?
अभिजीत दिपके यांनी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेत देशातील विविध विषयांवर भूमिका मांडली. यावेळी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना दिपके म्हणाले की, “आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. मात्र, निवडणुका या तरुणांच्या प्रश्नांवर आधारित असायला हव्यात. आपण किती काळ जाती आणि धर्माच्या आधारावर निवडणुका लढवणार आहोत? आज जग एआय सारख्या विषयांवर चर्चा करत आहे.” असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.
“आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत कॉक्रोच जनता पार्टी स्वतः निवडणूक लढवणार नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबाही देणार नाही. कोणी सरकार स्थापन करावं किंवा कोणी करू नये, यावर आम्ही भाष्य करणार नाही. आमची इच्छा आहे की, राष्ट्रीय राजकारणाचा मुख्य रोजगाराच्या संधी आणि दर्जेदार शिक्षणावर असावा.” असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं.
सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर रोखल्याने दिपकेंचा संताप
ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यानासाठी निघालेल्या सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर रोखल्याच्या घटनेवरून अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला. ‘सौरव दास यांच्याकडून सर्वात मोठी चूक झाली, कारण सौरव दास यांनी कोणताही घोटाळा केला नाही, जर सौरव दास यांनी घोटाळा केला असता, बँका लुटल्या असत्या तर त्यांना व्हीआयपी क्लिअरन्स देण्यात आला असता. जसं विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीला देण्यात आला होता’, अशा खोचक शब्दांत अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका करत संताप व्यक्त केला.
“सौरव दास यांना भारताच्या बाहेर जाऊ न देण्याचं कारण काय? एक भारतीय नागरिक विदेशात जाऊ शकत नाही का? सौरव दास काय एखादा गुन्हेगार आहे का? की सौरव दास यांनी कुठल्या बँका लुटल्या आहेत? मला वाटतं की सौरव दास यांच्याकडून सर्वात मोठी जी चुकी झाली, ती चूक म्हणजे सौरव दास यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. जर सौरव दास यांनी लोकांना चुना लावला असता, बँका लुटल्या असत्या, घोटाळा केला असता तर सौरव दास यांना व्हीआयपी क्लिअरन्स देण्यात आला असता. जसं विजय मल्ल्याला व्हीआयपी क्लिअरन्स देण्यात आला होता.” अशी टीका दिपके यांनी केली.




