
हवाई रुग्णवाहिका सेवेसाठी नवी नियमावली; शासनाकडून सात सदस्यीय समितीची स्थापना
गंभीर अपघात, दुर्धर आजाराचे रुग्ण तसेच हृदय, किडनी, यकृत प्रत्यारोपणासाठीचे अवयव तातडीने रुग्णालयात आणण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा वापरली जाते. या सेवांचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे.ही समिती हवाई रुग्णवाहिकांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात झालेल्या बैठकीत हवाई रुग्णवाहिकांसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार परिवहन, सार्वजनिक आरोग्य आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक सुनील भारद्वाज, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग, उपसंचालक जयंत मुळे आणि रस्ता सुरक्षा कक्षाचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद तावडे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. परिवहन उपआयुक्त सचिनकुमार गिरी यांच्याकडे सदस्य सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.




