लांजा शहरात उड्डाणपुलावर टाटा अल्ट्रोज कार व महिंद्रा स्कॉर्पिओ यांच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तीघे जण जखमी

लांजा: शहरात उड्डाणपुलावर टाटा अल्ट्रोज कार व महिंद्रा स्कॉर्पिओ कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तीघे जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नसून अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील रहिवासी असलेले प्रसाद रघुनाथ गुरव (वय ३२, रा.नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील टाटा अल्ट्रोज कारने क्रमांक (एमएच.०८.बीई.१०६७) राजापूर बंगलवाडी येथे बाराव्याच्या कार्याला गेले होते. ते दुपारी कार्य आटोपून ते रत्नागिरीला परत जात असताना लांजा उड्डाणपुलावर हा अपघात घडला. त्याच्यासोबत कारमध्ये रेखा रघुनाथ गुरव (वय ५५), शितल रघुनाथ गुरव (वय २७, दोघे रा.नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी) तसेच नातेवाईक सुजाता सुरेंद्र गुरव (वय ५५) आणि सुरेंद्र गणपत गुरव (वय ५९) असे पाच जण प्रवास करत होते.
प्रसाद गुरव हे आपल्या ताब्यातील अल्ट्रोज कार घेऊन लांजा उड्डाणपुलावर आले असता टाटा अल्ट्रोज कार आणि राजस्थानहून कारवार ला जाणाऱ्या स्कॉर्पिओ कार क्रमांक (जीजे.०२.डीपी. ९९५९) यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. या स्कॉर्पिओमध्ये कृष्णकुमार हिराराम देवासी (वय २४) हे आपली पत्नी चंपादेवी कृष्णकुमार देवासी (वय २३), मुलगी लक्षीता (वय ५ वर्षे) आणि दोन मुले माहिर (वय २.५) व प्रिन्स (वय १.५) हे सर्व (राहणार.वचनाराम, नासोली, ता.भिनमाल, जि.जालोर, रा.राजस्थान) येथील आहेत.
या दोन्ही कारच्या अपघातामध्ये अल्ट्रोज कारमधील प्रसाद व सुरेंद्र यांच्या डोक्याला तर सुजाता यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तर स्कॉर्पिओ मधील सर्व सुखरूप होते. मात्र, दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.
दरम्यान, कामानिमित्त उड्डाणपुलावरील एक लेन बंद असल्याने तसेच एकाच लेन वरून दोन्ही बाजूने वाहने सुरू असल्याने उड्डाणपुलावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. त्यामुळे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एक लेन वरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांना अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button