कीर्तीनगर येथे भटक्या कुत्र्याचा सहा वर्षीय बालकावर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी:
शहरातील कीर्तीनगर परिसरात भटक्या कुत्र्याने एका सहा वर्षीय बालकावर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्याची ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. हैदर असीम अन्सारी (वय ६ वर्षे, रा. कीर्तीनगर, रत्नागिरी) असे या जखमी मुलाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण कीर्तीनगर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सहा वर्षीय हैदर अन्सारी हा कीर्तीनगर परिसरात खेळत होता. यावेळी अचानक तेथे आलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याचा जोरदार चावा घेतला. कुत्र्याच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे हैदर प्रचंड घाबरून ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कुत्र्याला हुसकावून लावत हैदरची सुटका केली.
या हल्ल्यात हैदरच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला तात्काळ रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. सध्या रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून हैदरवर तातडीचे उपचार आणि आवश्यक ती लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर तसेच आसपासच्या भागात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले असून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. नगर परिषदेने या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी आता कीर्तीनगरमधील रहिवाशांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button