
नायरी मुस्लिम मोहल्ल्यात मध्यरात्री घराला भीषण आग
संसारपयोगी साहित्याची राखरांगोळी : देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे पहाटे उशिरापर्यंत अथक प्रयत्न
संगमेश्वर : तालुक्यातील नायरी मोहल्ला येथे मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने रौद्ररूप धारण करत नियाज पाटणकर आणि जाकीर पाटणकर यांचे कौलारू घर पूर्णपणे भक्ष्यस्थानी पाडले. घटना घडली तेव्हा हे घर बंद अवस्थेत होते आणि आत कोणीही वास्तव्यास नसल्याने सुदैवाने मोठी मनुष्यहानी टळली; मात्र, या दुर्घटनेत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण वास्तू जळून खाक झाल्याने पाटणकर कुटुंबाच्या उभ्या संसाराची एका क्षणात राखरांगोळी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अचानक या बंद घराला आग लागली. आगीने काही क्षणांतच संपूर्ण घराला वेढा घातल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच देवरुख येथील अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. परंतु, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आगीने घराचा ताबा घेतला होता, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. देवरूख नगरपंचायतच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पहाटेपर्यंत अथक प्रयत्न करून आग विझवली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करून मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून फणसवणे मंडल अधिकारी कदम, तलाठी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. प्रशासनाकडून प्रत्यक्ष पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, त्यानंतरच या आगीत झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.




