
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला एसटी बसची मागून धडक
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात साखरपा नजीक गोरेवाडी बसथांब्यासमोर पहाटे भीषण अपघात घडला. टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला लांजा आगाराच्या एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. आज (१३ नोव्हेंबर) पहाटे ४.४५ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात एसटी बसचे वाहक आणि प्रवाशांसह एकूण नऊ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील विलास रामचंद्र बोभाटे हे आयशर टेम्पो (क्र. एमएच ०७ एजे ६५५८) घेऊन कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जात होते. पहाटेच्या सुमारास गोरेवाडी बसथांब्यासमोर त्यांच्या टेम्पोच्या पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक पंक्चर झाला. त्यामुळे त्यांनी टेम्पो महामार्गाच्या कडेला उभा केला होता. याच दरम्यान, एसटी बस चालक जितेंद्र संभाजी पाटील हे लांजा आगाराची धाराशिव-लांजा ही बस (क्र. एमएच १४ एमएच ४८३५) घेऊन प्रवास करत होते. गोरेवाडी येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोच्या पाठीमागील उजव्या बाजूला एसटी बसची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने बसमधील प्रवाशांना दुखापत झाली.
या अपघातात एसटी बसचे वाहक रोकडेश्वर पिराजी तोटेवाड, फुलाजी बत्तलवाड आणि वैष्णवी बत्तलवाड (सर्व रा. लांजा) यांच्यासह बसमधील अन्य प्रवासी असे एकूण नऊ जण जखमी झाले. अपघाताची माहिती ११२ क्रमांकावर मिळताच साखरपा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील आणि पोलीस वाहनचालक स्वप्नील कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी प्रसंगावधान राखत सर्व जखमींना पोलीस वाहनातून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृतीच्या पुढील उपचारांसाठी जखमींना रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताची नोंद घेऊन साखरपा पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.




