
नारायण शेणवींचा ऐतिहासिक वाडा झाडी-झुडपांत हरवला!शिवराय आणि इंग्रजांमधील ऐतिहासिक संबंधांचा महत्त्वाचा दुवा दुर्लक्षित; दगडी बांधकाम आजही देत आहे इतिहासाची साक्ष
राजापूर ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजापूरच्या इतिहासाशी आणि इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित महत्त्वाची व्यक्ती म्हणून उल्लेख असलेल्या नारायण शेणवी यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या ऐतिहासिक वाड्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. राजापूर नगर वाचनालयासमोरील भटाळी परिसरात असलेल्या या वास्तूभोवती मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढली असून, वाड्याचे बांधकामही काळाच्या ओघात जीर्ण झाले आहे. मात्र, या वास्तूचे पारंपरिक दगडी बांधकाम आजही राजापूरच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत उभे आहे.
राजापूर येथील पत्रकार तसेच मंदिर व इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी या ऐतिहासिक वाड्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी वास्तूचे दगडी बांधकाम, शिल्लक राहिलेले अवशेष आणि परिसरात वाढलेली झाडी-झुडपे यांची त्यांनी पाहणी केली. शिवकालीन राजापूरच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या या वास्तूचे तातडीने दस्तऐवजीकरण करून तिचे संवर्धन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
शिवकालीन राजापूरच्या इतिहासाशी महत्त्वाचे नाते
सतराव्या शतकात राजापूर हे दक्षिण कोकणातील एक महत्त्वाचे व्यापारी बंदर म्हणून ओळखले जात होते. या ठिकाणी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीची वखार होती. राजापूरच्या इंग्रज वखारीच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यात वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नारायण शेणवी यांनी इंग्रजांचे दुभाषे, प्रतिनिधी आणि मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांमधील संदर्भांतून दिसून येते.
राजापूरच्या वखारीशी संबंधित नुकसानभरपाईच्या प्रश्नावर नारायण शेणवी यांनी मराठा दरबाराशी संपर्क साधला होता. पुढे १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पूर्वतयारीच्या काळात ते रायगडावर गेले होते. ४ एप्रिल १६७४ रोजी रायगडावरून त्यांनी मुंबईतील इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहिल्याचा ऐतिहासिक संदर्भही उपलब्ध आहे. या पत्रातून तत्कालीन राजकीय परिस्थिती, राज्याभिषेकाची तयारी आणि मराठा दरबारातील घडामोडींवर प्रकाश पडतो.
त्यामुळे राजापूरच्या इंग्रज वखारीपासून रायगडावरील मराठा दरबारापर्यंत इंग्रज आणि मराठा सत्तेमधील संवादात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नारायण शेणवी यांच्या नावाशी संबंधित हा वाडा राजापूरच्या इतिहासाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा ठरतो.
नाटककार राजेश देशपांडे यांच्याशीही वंशपरंपरेचे नाते
प्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक राजेश देशपांडे हे नारायण शेणवी यांचे थेट वंशज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या वास्तूचे महत्त्व केवळ ऐतिहासिक संदर्भांपुरते मर्यादित नसून, तिला एक वंशपरंपरागत ऐतिहासिक वारसाही लाभल्याचे मानले जाते. अशा महत्त्वाच्या वास्तूकडे केवळ एक जुनी, जीर्ण इमारत म्हणून न पाहता राजापूरच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण ठेवा म्हणून पाहण्याची गरज आहे.
ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज
वाड्याभोवती वाढलेली झाडी-झुडपे तातडीने हटवावीत, वास्तूचे पुरातत्त्वीय व वास्तुशास्त्रीय सर्वेक्षण करावे, शिल्लक असलेल्या दगडी बांधकामाचे जतन व संवर्धन करावे, तसेच या ठिकाणी नारायण शेणवी यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती देणारा माहितीफलक उभारावा, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे.
राजापूरच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या या वास्तूचे वेळीच जतन झाले, तर शिवकालीन राजापूर, इंग्रजांची वखार आणि रायगडावरील तत्कालीन राजकीय घडामोडी यांना जोडणारा ऐतिहासिक दुवा पुढील पिढ्यांसाठी जतन करता येईल. अन्यथा योग्य वेळी संवर्धन न झाल्यास इतिहासाची ही महत्त्वपूर्ण साक्ष काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती व्यक्त होत आहे.




