लोटेतील सर्व्हिस रोडला बेकायदा पार्किंगचे ग्रहण!

अपघातांचा धोका वाढला; महामार्ग प्राधिकरणासह महामार्ग पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे माळ परिसरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सर्व्हिस रोडवर बेकायदा पार्किंगचा विळखा पडला असून, त्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी निर्माण करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवरच मोठमोठी वाहने दिवसरात्र उभी केली जात असल्याने अन्य वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. या धोकादायक प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई- गोवा महामार्गावरील लोटे माळ येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने या परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने, कामगारांची वाहतूक करणाऱ्या गाड्या तसेच अन्य खासगी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. ही बाब लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला सर्व्हिस रोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या सुविधेचा उद्देशच बेकायदा पार्किंगमुळे धुळीस मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
मुळातच या परिसरातील सर्व्हिस रोडची रुंदी मर्यादित असताना त्यावर मोठमोठी अवजड वाहने दिवसभर आणि रात्रभर उभी केली जातात. त्यामुळे सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या अन्य वाहनांना मार्ग काढण्यासाठी पुरेशी जागाच शिल्लक राहत नाही. परिणामी, वाहनचालकांना नाइलाजाने मुख्य महामार्गावरून मार्ग काढावा लागतो. यामुळे मुख्य महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
विशेष म्हणजे, या मार्गावर औद्योगिक वाहतुकीची मोठी वर्दळ असताना सर्व्हिस रोडवरील बेकायदा पार्किंगकडे महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांचे लक्ष कसे जात नाही, असा संतप्त सवाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
सर्व्हिस रोडवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांसह वाहनमालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, तसेच या परिसरात नियमित गस्त आणि पार्किंग नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button