
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे जन आरोग्य समितीची सभा संपन्न
आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे जन आरोग्य समितीची सभा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या सभेमध्ये विधानसभा सदस्य यांनी सुचविलेले प्रतिनिधी म्हणून धामणसे येथील श्री. विश्वनाथ पांचाळ यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले असून, रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने हा मजला ताब्यात घेऊन तेथे रुग्ण तपासणी सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन (पोस्टमार्टम) कक्षाची दुरुस्ती, डीपबरिअरपीठ दुरुस्ती याबाबत चर्चा करून आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निश्चित करण्यात आले.
कार्यक्षेत्रातील किशोरवयीन मुलींचे एचपीव्ही (HPV) लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न व योग्य नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्रातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी नियुक्तीबाबत प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. तसेच नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेणे व संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच मा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. आबिटकर साहेब यांच्या 15 नोव्हेंबर रोजीच्या जिल्हा दौरा व जनसंवाद यात्रा या बाबत माहिती देण्यात आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेश साळवी, पंचायत समिती सदस्य श्रीमती पूर्वा दुर्गवळी, विधानसभा सदस्य यांनी सुचविलेले प्रतिनिधी श्री. पांचाळ, समितीच्या सचिव तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, कार्यक्षेत्रातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, तालुका प्रभारी आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. परशुराम निवेंडकर, समिती सदस्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथील मुख्यालयातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आरोग्य केंद्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जन आरोग्य समितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन प्रभारी आरोग्य विस्तार अधिकारी तथा आरोग्य निरीक्षक डॉ परशुराम निवेंडकर यांनी केले



