निवसर-भाटले येथे आंबा-काजूच्या बागेत रानगवा मृतावस्थेत

लांजा: तालुक्यातील निवसर-भाटले परिसरात आंबा-काजूच्या बागेत एका रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडीस आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला आणि त्यानंतर शवविच्छेदन केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील निवसर येथील भरत रामचंद्र झाडवे यांच्या आंबा-काजूच्या बागेत मंगळवारी सकाळी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर गावचे पोलीस पाटील दत्ताराम शांताराम मेस्त्री यांनी याबाबत वनविभागाला कळविले. घटनेची माहिती कळताच तात्काळ वनपाल धुळू कोळेकर यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही केली. तर मृत रानगवा हा अंदाजे १० ते १२ वर्षे वयाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अनुसे यांनी मृत रानगव्याचे शवविच्छेदन केले. तसेच यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम गुरव, वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे, श्रावणी पवार, जलद बचाव पथकाचे अमित लांजेकर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली असून रानगव्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button