
केजरीवाल अन् भगवंत मान यांना मोठा धक्का, ‘आप’च्या ३ आमदारांचा भाजपात प्रवेश; पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी!
गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे पंजाबमध्ये राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
पंजाब विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच आम आदमी पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन आमदारांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
आम आदमी पक्षाच्या हे तिन्ही आमदार सोमवारी भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. यामध्ये विद्यमान आमदारांचा समावेश आहे. आमदार हरमीत सिंग पठानमाजरा आणि चेतन सिंग जौरामाजरा यांनी १ नोव्हेंबर रोजी सत्ताधारी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता.
तसेच अमृतसर उत्तर मतदारसंघाचे आमदार कुंवर विजय प्रताप सिंग यांनीही आम आदमी पक्षाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या तिन्ही आमदारांनी आम आदमी पक्षाची साथ सोडून भाजपात प्रवेश केल्यामुळे पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात या तिन्ही नेत्यांनी अधिकृतपणे भाजपात पक्षात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे पंजाबचे प्रभारी सतीश पुनिया, सह-प्रभारी वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाचे इतर काही नेते उपस्थित होते. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
‘पंजाबमध्ये ‘यूपी मॉडेल’ची गरज’
दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार कुंवर विजय प्रताप सिंग यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ सरकारवर जोरदार टीका केली. पंजाब राज्य बेरोजगारीशी झुंज देत आहे, तर सत्तेच्या वर्तुळात गुंडांचा प्रभाव वाढत चालला आहे. पंजाब आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. पंजाबमध्ये आता गुंड पंजाब सरकारचा भाग बनत आहेत”, अशी टीका सिंग यांनी केली.
हरमीत सिंग पठानमाजरा यांनी म्हटलं की, “शेतकऱ्यांवरील कर्जाचं ओझं आणि पंजाबमधील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सारख्या प्रश्नांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात गुंडगिरीवर नियंत्रण मिळवण्यात आलं, त्याप्रमाणे पंजाबमध्ये भाजपाचे सरकार आल्यास राज्यात कायदा-सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होईल.”




