
‘ई-८५’ इंधनावर प्रतिलिटर २० रुपये सवलत; देशभरात निवडक ठिकाणी विक्री सुरू!
- देशात शुक्रवारपासून ‘फ्लेक्स फ्युएल’ वाहनांसाठी ‘ई-८५’ या इंधनविक्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला देशातील निवडक पेट्रोल पंपांवर ते विक्रीसाठी उपलब्ध असेल, तसेच ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर २० रुपये सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असेल. ‘फ्लेक्स फ्युएल’ म्हणजे एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनांवर चालण्यास सक्षम इंजिन असलेले वाहन.
आंतरराष्ट्रीय पर्यावरणदिनाच्या निमित्ताने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील एका इंडियन ऑइलच्या विक्री केंद्रावर ई-८५ची विक्री सुरू करण्यात आली. शुक्रवारी देशात ४८ पेट्रोल पंपांवर ई-८५ उपलब्ध करून देण्यात आले. या वर्षाअखेरीस ५०० आणि पुढील वर्षाअखेरीस ५,००० पेट्रोल पंपांवर ई-८५ देण्याची योजना आहे.
ई-८५मध्ये ८० ते ८५ टक्के इथेनॉल आणि १४ ते १९ टक्के पेट्रोल असते. ते केवळ ई-२० ते ई-१०० या श्रेणीतील इथेनॉलमिश्रित इंधनावर चालू शकणार्या ‘फ्लेक्स फ्युएल’ वाहनांमध्ये वापरता येते. ‘ई-८५’च्या विस्तारामुळे २०३०-३१पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्र्रमाण २६ टक्के होण्याची अपेक्षा आहे.
*




