लांज्यात घराची कौले काढून ७.८७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; चार वर्षांनंतर गुन्हा दाखल

लांजा: तालुक्यातील वेरवली खुर्द-कातळवाडी येथे घराची कौले काढून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने सुमारे ७ लाख ८७ हजार ८७७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर लांजा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २ जून २०२२ रोजी रात्री ११ ते ३ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान वेरवली खुर्द येथील कातळवाडीमध्ये घडली. फिर्यादी अभिजित हेमंत लाड (वय ३९, सध्या रा. प्रभादेवी, मुंबई) यांच्या आई नम्रता लाड (वय ६३) या रात्री घरात झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराची कौले काढून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने लंपास करून चोरटा पसार झाला.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये दोन सोन्याच्या रिंगा, दोन सोन्याच्या पाटल्या, चार सोन्याच्या बांगड्या, एक गोफमाळ आणि हिऱ्याची अंगठी अशा दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची अंदाजित किंमत ७ लाख ८७ हजार ८७७ रुपये आहे.

याप्रकरणी अभिजित लाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०५ (क) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button