
आविष्कारची दिवाळी भेट
.

रत्नागिरी : दिवाळीची चाहूल लागताच आविष्कारमध्ये हस्तकलेतून साकार होणाऱ्या आणि दिवाळीसाठी उपयुक्त अशा वस्तू निर्मितीचे वेध लागतात आणि साकार होत जाते विविध हस्तकलाकृती. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून श्री. शामराव भिडे कार्यशाळा आणि मीरा लिमये उद्योग केंद्र विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करीत असते. या वस्तू निर्मितीतून विद्यार्थ्यांना अनेक कलागुणांना वाव मिळत असून विद्यार्थी स्वावलंबी होऊन अधिक प्रोत्साहित होताना दिसतात.
प्रौढ दिव्यांगाना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून एक उत्पादक घटक बनविण्याकरिता श्री. शामराव भिडे कार्यशाळा गेली ३४ वर्षे कार्यरत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळेला यश आले आहे. व्यावसायिक पुनर्वसित विद्यार्थी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावताना दिसतात.
विद्यार्थ्यांना शासकीय मदत मिळवून देऊन त्यांना त्यांच्या स्वयंरोजगाराकरिता अधिक प्रोत्साहित केले जात आहे. कार्यशाळा आणि उद्योग केंद्राच्या माध्यमातून खास दिवाळीकरिता लागणाऱ्या विविध वस्तू आणि बरेच काही तयार करून त्याची विक्री करण्यात येते. विद्यार्थी विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः वस्तू निर्मिती केलेल्या वस्तू विक्री करीत असतात. त्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होऊन त्यांचे पुढील कौशल्य विकसित होण्यासाठी मोलाची मदत होत असते.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची विक्री करून मिळणारा नफा विद्यार्थ्यांना विभागून दिला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून पुढील व्यावसायिक कौशल्य विकसित होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्तन समस्या देखील काही अंशी कमी होताना दिसत असून, पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना होम बेस अॅक्टिव्हिटी अंतर्गत प्रशिक्षणाचा काही भाग विद्यार्थ्यांना घरी करण्यासाठी देण्यात येत असतो. या अॅक्टिव्हिटी चा फार मोठा उपयोग होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळत आहे या उपक्रमामध्ये पालक देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेत आहेत.
या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांसाठी खास दिवाळीनिमित्त सुंदर भेट वस्तूंचा आकर्षक गिफ्ट बॉक्स बरोबरच आकाश कंदील, हँडमेड साबण, पिशव्या, मेणबत्ती, अगरबत्ती, धूप काडी, फोटो फ्रेम, आकर्षक विविधरंगी पर्स आणि बरेच काही निर्मिती केले आहे. विद्यार्थ्यांच्या हस्त कौशल्यातून आणि मेहनतीतून साकारलेल्या या वस्तूंची खरेदी करून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सतत पुढे जाण्याच्या त्यांच्या जिद्दीला बळ देऊया.
संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या कलाकृती ने वस्तू निर्मिती केली आहे. या सर्व वस्तू संस्थेमध्ये विक्री करिता उपलब्ध आहेत. रविवार दिनांक १ नोव्हेंबर ते बुधवार दिनांक ४ नोव्हेंबरअखेर सायंकाळी ४ ते ९ या वेळेमध्ये स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे वस्तू विक्री स्टॉलचे आयोजन केले आहे. या विक्री स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ सीए श्रीकांत वैद्य यांच्या शुभहस्ते रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी सायं. ४ वा. होणार आहे.
विक्री केंद्रावर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू विद्यार्थी विक्री करताना दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण देखील या विक्री केंद्राला आवर्जून भेट द्या. असे आवाहन आविष्कार संस्था परिवाराने केले आहे.



