
2019 ला मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहत राहिलो, पण…’ मुख्यमंत्री फडणवीसांनी काढला चिमटा, सभागृहात एकच हश्शा
विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीच्या मुद्यावरून एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले ठाकरे बंधु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत एका कार्यक्रमानिमित्ताने एकत्र व्यासपीठावर आहे.यावेळी, २०२९ पर्यंत फडणवीस यांना मुख्यमंत्री राहु तरी द्या, असा खुमसदार टोला राज ठाकरेंनी लगावला. त्यानंतर ‘२०१९ ला उद्धव ठाकरेंनी काही फोनच केला नाही, मी वाट पाहतच राहिलो’ असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना चांगलाच चिमटा काढला.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या विशेष ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे मंत्री आशिष शेलार हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आहे. यावेळी ठाकरे बंधुंचं भाषण झाल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
“सगळेच लोक डाव्या बाजूला गेले म्हणून मी जाणून बुजून उजवीकडे आलो. या प्रकाशनासाठी राज ठाकरेंचा फोन आला होता. राज ठाकरेंनी फोन केला की, मुख्यमंत्री फडणवीस येतात, असं आशिष शेलार यांनी म्हटलं. पण, २०१९ पर्यंत उद्धव साहेबांनी जेव्हा जेव्हा बोलावलं तेव्हा तेव्हा मी गेलो. त्यांनी कोणत्याही कामासाठी बोलावलं मी गेलो. पण, २०१९ ला त्यांचा काही फोन आलाच नाही, नंतर त्यांनी कधी बोलावलच नाही, मी वाट पाहत राहिलो, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तानाट्यावर उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.तसंच, “भाषण शेवटी करण्याचा फायदा असतो, मी काही बोललो तरी, राज ठाकरे आज तरी उत्तर देऊ शकणार नाहीत. बॅकफायर काही होणार नाही. व्यंगचित्राची कला अशी आहे की एकही शब्द न बोलता पाहिजे तेवढे फटकारे मारता येतात, आणि योग्य ते पोहचतही. एखादा अग्रलेख जे सांगतं ते एक व्यंगचित्र सांगत असतं. आम्ही व्यंगचित्रांचे ऑब्जेक्ट आहोत. आम्हाला कोणीही काढून देतं, पण ते कसंही असलं तरी छान वाटतं. मी राज साहेबांना सांगितलं होतं माझं व्यंगचित्र काढताना काहीही मोठं काढा पण पोट नका मोठं काढू. त्यांनी माझं ऐकलं होतं. पण, अलीकडच्या व्यंगचित्रकारांनी माझं काही ऐकलं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगतच सभागृहात एकच हश्शा पिकली.
राजकारणी म्हणून काम करू द्या -मुख्यमंत्री फडणवीस
“या मंचावर आम्ही एकत्र येणार याच का आश्चर्य लोकांना वाटलं माहित नाही, मला नाही वाटलं. चांगल्या कामासाठी एकत्र येऊ शकतो. मुंबईत व्यंगचित्रकारणकरिता दालन आम्ही नक्कीच उभारू, त्यासाठी उद्धव साहेब आणि राज साहेबांची नक्की मदत घेऊ. जाता जाता छोटी अपेक्षा व्यक्त करतो. प्रत्येकाची जमेची बाजू असते. हे व्यंगचित्र छान काढतात, ते छान छायाचित्र काढतात, मी राजकारणात आहे, त्यामुळे त्यांनी मला ते करू द्यावं, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना कोपरखळी मारली.




